सार्वजनिक शौचालयं हि आज चर्चेचा विषय बनताहेत. हि एक चांगली गोष्ट आहे. कारण कधीकाळी सार्वजनिक शौचालय म्हणजे “भुतांचा अड्डा” असा सर्वसामान्यांचा कयास असायचा. आज तसे राहिले नाही. उदाहरणाचा द्यायचे झाले तर त्रिरत्न प्रेरणा मंडळाचे देता येईल. सर्वगुण संपन्न असे शौचालय मुंबईनगरीत आहे, थोडक्यात काय तर सोलार लाईट, सोलार वोटर हिटर, टेरेस गार्डन, महिला बचत गटांसाठी कम्युनिटी किचन(हल्लीच काम थांबले आहे) शिवाय घरघंटी, CBO चे शौचालयाचा कारभार चालविण्यासाठीची कार्यालयासारखीच जागा, महिला शौचालयासाठी सर्व सुविधा अगदी सुरक्षिततेपासून सॅनेटरी पेड डिस्पोसल आणि फ्रेशरूम ते इंग्लिश कमोटपर्यंत सर्वच! प्रत्येक वापरकर्त्यांना हात धुण्याची सोय, तरुणांकरिता केरम, संगणक प्रशिक्षण केंद्र आणि कचरा व्यवस्थापनातुन ई-वेस्ट कलेक्शन ते निर्माल्यापासून खत निर्मिती अशा विविध कारणांनी शौचालय ३६० अंशाच्या कोनात कार्यरत आहे. अशी अनेक शौचालय नाहीत परंतु काही मोजकीच शौचालय आहेत जी आपापल्यापरीने शौचालयाची उपयुक्तता प्रत्यक्षात आणताना दिसतात.
आमच्या मते जर का सार्वजनिक शौचालयांवर योग्य प्रकारे लक्ष दिले किंवा त्याचा वापर सामाजिक बदलांसाठी करावयाचे ठरविले तर मुंबईतली अर्ध्यापेक्षा अधिक घाण नष्ट झालेली दिसेल.
नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्यात, जनतेची सेवा करणारे २२७ भावी नगरसेवक चांगल्या मतांनी निवडून आले आहेत. जर प्रत्येक नगरसेवकांनी अशाप्रकारची शौचालय आपल्या विभागात उभारायची ठरविले तर कदाचित मुंबईत घडणा-या ओपन डेफिकेशनचे प्रमाण उतरलेले दिसेल.
किंबहुना मुंबई महापालिकेने मागच्या टर्म मध्ये नगरसेवकांना लॅपटॉप दिले पण अट अशी ठेवण्यात आली कि आपली पाच वर्षांची टर्म पूर्ण झाल्यावर ते लॅपटॉप महापालिकेला परत करायचे. असेच काहीसे झोपडपट्टीतल्या वस्ती शौचालयांबाबत करता येईल का(?) हे तपासायला हवे.
सध्या काय होते आहे, कि एखाद्या फलाना पक्षाचा नगरसेवक आपल्या पक्षाच्याच कार्यालयात बसून लोकांची गा-हानी ऐकत असतो. तेव्हा त्याच्याकडे येणारे गरजवंत हे त्याच्या पक्षाचेच असतील असे नाही, तर ते अन्य पक्षाचे सुद्धा असू शकतात. त्यामुळे होते काय कि अन्य पक्षाची लोक त्या नगरसेवकाच्या दरबारात जायला कचरतात, आणि मग नगराची सेवा करण्यासाठी मतदान केलेले असते तिथे विरोधाभास निर्माण होतो.
असाच प्रकार आणखी एके ठिकाणी घडत असतो, तो म्हणजे सार्वजनिक शौचालयांवर! जे शौचालय एखाद्या आमदार/खासदार निधीतून बनविण्यात येते तेथे त्या त्या आमदार/खासदाराच्या खास माणसांचा दरारा असतो. अन्य कोणी सदरचे शौचालय वापरायला आला कि त्याच्याकडे, ‘आमच्या सायबांनी तुमच्यावर मेहरबानी केली आहे.’ अशा अविर्भावात ते त्या आमदार/खासदाराचे कार्यकर्ते धारधार नजरांनी बघत असतात. म्हणजे शौचालय सारख्या मूलभूत सुविधेच्या वापरातही हेवेदावे केल्या जातात.
आम्ही असे विचारू इच्छितो कि, जेव्हा एखादी व्यक्ती सार्वजनिक क्षेत्रात स्वतःला झोकून द्यायला तयार होते तेव्हा त्या व्यक्तीने किंवा नगरसेवकांनी त्यांच्या खाजगी मालमत्तेचा वापर का करावा(?) किंबहुना अशाप्रकारे आपल्या व्यक्तिमत्वाचा दरारा का निर्माण करावा(?)
जर का मुंबई महानगरपालिका त्यांना लॅपटॉप देऊ शकते, कारण लोकांची गा-हानी लवकरात लवकर सुटावी. म्हणुन तर नगरसेवकांनी आपल्या कॉर्पोरेट ऑफिसात बसण्याऐवजी लोकांत मिसळावे! असे का होऊ शकता नाही.
पुढे जाऊन असे वाटते. कि मुंबई महापालिकेने आपल्या २२७ प्रभागातील सुयोग्य ठिकाणी असलेल्या म्हाडाच्या दुर्गंधीयुक्त शौचालयांना पाडून पालिकेच्या नगरसेवकांना शोभतील अशी शौचालय उभारून त्यावर या लोकप्रतिनिधीचे कार्यालय बांधून द्यावे.
योजनेत एक धोका तुम्ही व्यक्त करू शकता तो म्हणजे ते शौचालयाचा गैरवापर होऊन भविष्यात कदाचित त्यावर मालकी हक्क सांगितल्या जाईल. जर हे खरे असेल तर तो लोकप्रतिनिधींचा दोष म्हणता येणार नाही तर आपले प्रशासन कायदे राबविण्यात अयशस्वी ठरतंय असा त्याचा अर्थ होईल. जर का महापालिकेने दिलेले लॅपटॉप आपण पाच वर्षांनी परत मागवू शकतो तर शौचालयाची वास्तू तर त्यापेक्षा महाग आहे, त्यासाठी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर बरेच होईल.
नाहीतरी नगरसेवकांची निवड का करण्यात येते तर ४३% सोसायटी आणि ५७ % असलेल्या झोपडपट्टीच्या मूलभूत सुविधांच्या देखरेखीसाठी… त्याच्या आपूर्तिसाठी! मग तो नगरसेवक आपल्या “महाला”सारख्या भासणा-या कार्यालयात बसून किती टक्के लोकांपर्यंत पोहचतो.
एकदा प्रजा फाउंडेशन सारख्या संस्थानीं याचा सर्वे करायला हवा, ‘ किती टक्के सामान्य लोक आपापल्या प्रभागातील नगरसेवकाच्या कार्यालयात आपल्या तक्रारी घेऊन जातात?’ आमच्या मते त्या प्रभागात झालेल्या एकूण मतदानाच्या ४ ते ५ टक्के लोकच त्यांच्या नगरसेवकाच्या कार्यालयाचा उंबरठा झिजवत असतात. बाकीचे ‘तो आपला उमेदवार नव्हता’ किंवा दरा-यामुळे असेल, म्हणुन निमूटपणे होणारा त्रास सहन करीत असतात.
बरं या नगरसेवकांचे कार्यालय जर घरात असेल तर त्यांच्याकडे असलेले प्राणी २४x७ दक्ष असतात आणि असे अंगावर येतात कि मालकाने अनेक दिवस उपाशी ठेवले आहे. आता चांगलाच बकरा आला याचा फडशा पाडणारच! बिचारा विनंती घेऊन आलेला तक्रारदार सायबांची भेट तर दूरच तो जिथल्यातिथे थबकतो. हि एक अजबच भूतदया काही नगरसेवकांच्या घरी पाहायला मिळते.
मग प्रश्न असा पडतो कि सामान्य जनतेने आपल्या सोयी सुविधांसाठी एक नगराचा सेवक निवडून दिला आहे कि नगराचा मालक निवडून दिला आहे?
जर का सामान्य माणूस आपल्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचायला येवढा त्रासत असेल तर त्या नगरसेवकाला त्याच्या खाजगी कार्यालयातून बाहेर लोकांमध्ये नको का आणायला?
म्हणून असे वाटते कि नगराचा नगरसेवक हा लोकांच्यामध्ये वावरला पाहिजे तरच आणि तरच मुंबईत कायापालटाला सुरुवात होईल.
मुंबईत असलेल्या प्रत्येक वार्डातले एक तरी शौचालय मुंबई महापालिकेने पालिकेतील नगरसेवकांच्या कार्यालयाची जागा म्हणून आरक्षित करून त्याची सुसज्ज उभारणी करायला हवी आणि दुसरे म्हणजे महापालिकेची मालमत्ता ढापणे हे फक्त त्या “बिचा-या” नगरसेवकाचे किंवा लोकप्रतिनिधींचे काम नाही, तर आपल्या पालिकेतील कोण अशा प्रकारच्या ढापाढापीत सामील आहे, कोण त्यांना ‘ध’ चा ‘मा’ करण्यास मदत करतो हे शोधून त्यांच्या पगारातून अशा मिळकतींची वसुली करायला हवी.
दुसरे असे कि मुंबईने आज पर्यंत किती महापौर पाहिले त्यांनी नाही कधी त्यांच्या बंगल्यावर हक्क दाखविला मग नगरसेवक असे काय अधिकार गाजवू शकतात?
कधीतरी एखाद्या अपघातासमयी येऊन लोकांचे सांत्वन करण्यापेक्षा किंवा वटपौर्णिमेला जसे त्या एकाच दिवशी फे-या मारल्या जातात तसे फे-या मारण्यापेक्षा किंवा स्वप्न पडल्यावर आपल्या प्रभागात फे-या मारणारे नगरसेवक असे ना राहाता, ज्या तो-यात निवडून आले आहेत त्याच तो-यात नगराची सेवा व्हावी म्हणून यांना खाजगी वस्तू आणि वास्तू वापरण्यावर मर्यादा आणून लोकांत बसण्याची सवय लावण्याची गरज आहे. तरच यांचा नगरसेवकाचा नगरमालक होणार नाही. असे मनापासून वाटते.
जर का अख्या मुंबईचे प्रथम नागरिक म्हणुन महापौरांच्या वास्तुबाबत आपण दक्ष असतो तर आमचा नगरसेवक देखील आमच्या प्रभागाचा प्रथम नागरिक ठरतो. त्याच्या कार्यालयाबाबत देखील विचार व्हायला! आणि ते कार्यालय महापालिकेने प्रत्येक प्रभागात निर्माण करावे. जेणेकरून नगरसेवक लोकांच्यातला भासेल. “सामान्यांच्या मनाचा नादनिनाद” शासन दरबारी पोहोचविणारा!



















